महाराष्ट्रराजकारण

अखेर खर्गे यांना हटवले; कॉंग्रेस कार्यकारिणीत मोठे बदल

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत. अनेक नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने राष्ट्रीय कार्यकारिणीची तडकाफडकी फेररचना केली आहे. तसेच पदाधिकाऱ्यांमध्येही फेरबदल करून नवे चेहरे आणले आहेत. यात महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जागी एच. के. पाटील या दुसऱ्या कर्नाटकच्या नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता या कार्यकारिणीमध्ये राजीव सातव, रजनी पाटील, मुकुल वासनिक, अविनाश पांडे या महाराष्ट्रातील नेत्यांना स्थान मिळाले आहे. मात्र, कार्यकारिणीत स्थान मिळण्याची चर्चा असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र नव्या फेररचनेतही संधी मिळू शकली नाही. कॉंग्रेस पक्षसंघटनेच्या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक यंत्रणा स्थापन करून त्याची जबाबदारी मधुसूदन मिस्त्री या राहुल गांधी यांच्या निकटच्या नेत्याकडे दिली आहे.

कॉंग्रेसने संघटनात्मक बदल आज रात्री उशिरा जाहीर केले. सोनिया गांधी परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पक्षाची अप्रत्यक्ष जबाबदारी राहुल गांधी यांच्याकडे आली आहे. नव्या बदलामध्ये संघटनेतील ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा, गुलामनबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, लुईझिनो फालेरो, अंबिका सोनी यांच्याकडील जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. नवी कार्यकारिणी नियुक्त करतानाच नवे सरचिटणीसही नियुक्त करण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात देखील पक्षात मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे.