कृषीमहाराष्ट्र

अखेर केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. तसेच विरोधकांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली होती. पण अखेर मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. सोमवारी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सोमवारपासून बंदरात आणि सीमेवर कांदा अडवून ठेवण्यात आला होता. मात्र आता अडवून ठेवलेल्या कांद्याला केंद्र सरकारने पुढे पाठवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्यात आला असल्याचे चित्र दिसत आहे.

हजारो मॅट्रिक टन कांद्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र देशातून विदेशात नियमितपणे कांदा निर्यात केली जाते यावर केंद्र सरकार लवकरच निर्णय जाहीर करेल. कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांपासून ते राज्य सरकारने केंद्राच्या या निर्णयावर सडकून टीका केली होती.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पियुष गोयल यांना पत्र लिहून कांदा बिर्यातबंदीच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांनी पियुष गोयल यांची भेट घेऊन हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आणि देशासाठी धोकादायक आहे असे सांगितले होते. शरद पवार यांनी पियुष गोयल यांना पटवून दिले की, निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे