महाराष्ट्रराजकारण

‘सिल्व्हर ओक’मध्ये पाच जणांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी 15 सुरक्षारक्षक तैनात असतात. एकूण सहा जणांची रॅपिड अँटिजन कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये काही सुरक्षारक्षकांचा टेस्ट रिपोर्ट आला आहे.

यामध्ये तीन सुरक्षारक्षक आणि दोन कर्मचारी अशा पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार व्यवस्थित आहेत. कालच त्यांची टेस्ट करण्यात आली होती. त्यांना कोणतीही अडचण नसून ते सुरक्षित आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सिल्व्हर ओकमधील इतर सर्व कर्मचारी आणि शरद पवार यांचे पीए यांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे या दोघांच्याही सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तसेच रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकाला देखील कोरोना झाल्याचं समोर आलं होतं.