महाराष्ट्रराजकारण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणी अचानक स्थगित

दादरच्या इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा अचानकपणेच पुढे ढकलण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दुपारी तीन वाजता पायाभरणी सोहळा होणार असल्याचे, काल सांगण्यात आले होते. मात्र, एमएमआरडीएकडून आजचा कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे.

सर्व विभागांशी समन्वय साधून या कार्यक्रमाची पुढील तारीख ठरवण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच कार्यक्रम घोषित करु अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सुरुवातीला कार्यक्रमाचे निमंत्रण बहुजन वंचित आघाडी डॉ. प्रकाश आंबेडकर तसेच रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनाही देण्यात आले नव्हते.

मात्र, चौफेर टीकेनंतर त्यांना आमंत्रण देण्यात आले. याविषयी बोलताना आनंदराज म्हणाले, “मला निमंत्रण आलं नव्हतं. वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया वातावरण तयार झालं. त्यानंतर एमएमआरडीएने पत्र पाठवून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं. एमएमआरडीएच्या कामावर प्रश्न उपस्थित केल्याने ते आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. संपूर्ण कामाच्या दर्जासाठी एक समिती बनवावी, अशी माझी विनंती आहे.

स्मारक तयार झाल्यावर लाखो लोक येणार आहेत. समुद्राच्याजवळ असल्यामुळे दर्जा न राखल्यास अपघात झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असणार आहे. तसेच हा कार्यक्रम एवढ्या घाईने उरकरण्याची गरज काय होती, असा प्रश्नही आनंदराज आंबेडकर यांनी विचारला आहे.