कोरोनामहाराष्ट्र

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी विशेष रेल्वेकडे फिरवली पाठ

Newsliveमराठी – गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी १५ ऑगस्टपासून मध्य रेल्वेवरून विशेष गाडय़ा रवाना होताच पुढील गाडय़ांचेही आरक्षण उपलबध करून देण्यात आले. मात्र या गाडय़ांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

विशेष रेल्वे गाडय़ांचे २२ ऑगस्टपर्यंतचे आरक्षण केवळ २५ टक्क्य़ांपर्यंतच झाले. प्रत्येक गाडीला १ हजार ६३८ प्रवाशांपैकी सरासरी ४०० प्रवासी मिळाले आहेत. राज्य सरकारने उशिरा घेतलेला निर्णय आणि विलगीकरणाच्या अटीमुळे अनेक जण याआधीच खासगी वाहनांनी कोकणाकडे रवाना झाले. विशेष रेल्वे आधीच सोडल्या असत्या तर प्रतिसाद वाढला असता.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी कोकणासाठी चार विशेष रेल्वे रवाना झाल्या. या गाडय़ांसाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १ हजार ४८ प्रवाशांनी आरक्षण केले होते. सीएसएमटी येथून रात्री ११.०५ वाजता सावंतवाडीला जाणाऱ्या गाडी क्रमांक ०११०१ साठी सायंकाळी ६ पर्यंत ४४४ प्रवाशांनी, त्यापाठोपाठ एलटीटीहून कुडाळला जाणाऱ्या गाडी क्रमांक ०११०३ साठी ४२८ प्रवाशांना तिकीट मिळाले होते. ही गाडी रात्री ११.५० वाजता रवाना होणार होती. रात्री १० वाजता सीएसएमटीहून सावंतवाडीसाठी सुटणाऱ्या गाडी क्रमांक ०११०५ ला केवळ १२२ प्रवासी आणि एलटीटीहून रत्नागिरीसाठी रात्री १०.३० वाजता सुटणाऱ्या गाडी क्रमांक ०११०७ लाही ५४ प्रवासीच होते.