कोरोनामहाराष्ट्र

राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात; साध्या पद्धतीने बाप्पाचे आगमन

जगभरात सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे कोरोना संकटाच्या सावटाखाली सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बाप्पाचं आगमन होत आहे. अनेक घरांमध्ये तर कालपासूनच बाप्पाचं आगमन झालं आहे.

काही ठिकाणी आज पहाटेपासून बाप्पाचं आगमन होत आहे. कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधनं आली आहेत. पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून बाप्पाचं आगमन केलं तर कोरोना संसर्गाची भीती आहे. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्व सण साध्या पध्दतीने साजरे करतात येत आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक निघणार नाही. दरम्यान, पुण्यातही आज मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे. मंडळाना नियम व अटी घालून सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.