राजकारण

सरकारने मराठे व ओबीसींमध्ये भांडणे लावली- प्रकाश आंबेडकर

टिम Newslive मराठी:  सरकारने मराठे व ओबीसींमध्ये भांडणे लावली आहेत. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणातील वाट्यासह स्वतंत्र १६ टक्के आरक्षण मराठ्यांना दिल्याने ओबीसी अस्वस्थ आहेत. कधीची सत्तेची अभिलाषा न बाळगणारा ओबीसी समाज आता स्वतःचे आमदार-खासदार-मंत्री असण्याची गरज मांडू लागला आहे. निवडणूक काळात ती उफाळून येण्याची भीती आहे, असा दावा भारिप-बहुजन महासंघाचे अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केला.

राज्य घटनेने ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे व सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकणार नाही. सरकारने आताच हा विषय सर्वोच्च न्यायालयात नेला पाहिजे. मराठ्यांचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण स्पष्ट करणारा गायकवाड समितीचा अहवाल सर्वांसाठी खुला झाला पाहिजे.

या अहवालातील काही भाग जाहीर करण्यास सरकारने नकार दिला आहे. पण गुप्त ठेवल्या जात असलेल्या या माहितीतून सामाजिक विषमता दाखवली गेली असेल वा राज्यकर्ते जनतेशी कसे वागले, याचे चारित्र्य मांडले गेले असेल, तर ते आवर्जून समाजासमोर आले पाहिजे. यातून लोकप्रबोधन सुरू होऊन समाजविकासाचा उद्देश साध्य होईल,असा दावाही त्यांनी केला आहे.

‘तीन राज्यांत काँग्रेस विजयी झाले असले, तरी देशपातळीवरील भाजपविरोधी आघाडी अजून अस्थिरच आहे. काँग्रेसच्या विजयाने पंतप्रधानपदाचे अनेक आत्मे पुन्हा जिवंत झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसने भाजपविरोधातील सर्वांशी संवाद वाढवला पाहिजे. देशात भाजपविरोधी वातावरण वाढत असून, लोकसभेत त्यांच्या दोनशेच्या आत जागा येतील,’ असा दावाही आंबेडकरांनी केला.