महाराष्ट्रशैक्षणिक

आता पदवी परीक्षा ऑक्टोबरअखेर होण्याची शक्यता!

कोरोनाचे कारण देत अंतिम वर्षांची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली जाऊ शकत नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार महाविद्यालये आणि विद्यापीठांना परीक्षा घ्यावी लागेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. मात्र, एखाद्या राज्याला परीक्षा पुढे ढकलण्याचा अधिकार असून त्या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाशी स्वतंत्रपणे चर्चा करावी आणि परीक्षेसाठी नव्या तारखा निश्चित कराव्यात, असा आदेश न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शहा यांच्या पीठाने दिला. यामुळे ही थोडी दिलासादायक बाब आहे.

अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला होता. त्यावर, पदवी बहाल करण्याचा अधिकार यूजीसीचा असून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परीक्षा रद्द करू शकत नाही, असा युक्तिवाद यूजीसीच्या वतीने केला गेला होता. युवासेनेच्या वतीने परीक्षा रद्द करण्याचा व सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा युक्तिवाद मात्र न्यायालयाने अमान्य केला.

परीक्षा न घेता पदवी बहाल करता येणार नाही, तसेच यूजीसीने काढलेला ३० सप्टेंबपर्यंत परीक्षा पूर्ण करण्याचा आदेश रद्दबातल केला जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यामुळे आता परीक्षा होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.