कृषीमहाराष्ट्र

खपली गव्हापासून शेतकऱ्याने बनवली आरोग्यवर्धक बिस्किटे

शेतकरी शेतात नेहेमी नवनवीन प्रयोग करत असतो. निफाड येथील अक्षय नवले व कुटुंबीय वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. मात्र प्रयोगशील तंत्रज्ञानाद्वारे नवनवीन प्रयोग शेतीत करताना असा अनुभव आला की कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करत असताना रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरून जमिनीचा पोत खराब होत आहे.

शिवाय पीक हातात येईपर्यंत अमाप पैसा खर्च होतो आणि रासायनिक खतांचा वापर केल्याने उत्पन्न फारसे निघत नाही, बाजारभावाचा उतरता आलेख पाहून शेतीचे अर्थकारण कोलमडले यातून काहीतरी मार्ग काढण्याच्या उद्देशाने अर्ध्या एकरात मधुमेहींसाठी खपली गव्हाची लागवड केली. आलेल्या उत्पादनातून बिस्किटे तयार करण्याची कल्पना सुचली. यातून घरच्या सेंद्रिय उसापासूनचा सेंद्रिय गूळ आणि खपली गहू यापासून बिस्किटे तयार केली.

ही बिस्किटे मधुमेहींसाठी उपयुक्त असून, बद्धकोष्ठता, शारीरिक व्याधींवर गुणकारी असल्याचे नवले यांनी सांगितले. गेल्या आठ वर्षांपासून नवले निफाड परिसरातील आठवडेबाजारात सेंद्रिय उत्पादन घेऊन निफाडकरांना विषमुक्त शेतमाल विक्री करत असून त्याला चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. दर रविवारी ते नाशिकच्या सिटी सेंटर मॉल येथे आपला सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला माल विकत असल्याचे नवले कुटुंबीयांनी सांगितले.