कोरोनामहाराष्ट्र

हॉटेल आणि बार रात्री १० पर्यंत चालू राहणार

लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांपासून रुळावरून घसरलेल्या अर्थव्यवस्थेला ट्रॅकवर आणण्यासाठी राज्य सरकारने हॉटेल्स, रेस्टॉरंट, फुड कोर्टस, बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पर्यटन विभागाने राज्यातील हॉटेल आणि बार सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक बुधवारी जारी करण्यात आले आहे.

५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट, फुडकोर्ट ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात परवानगी दिली आहे. राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत शनिवारी आदर्श कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे.

मात्र बार आणि हॉटेल उघडण्याची तसेच बंद करण्याच्या वेळा ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते. आता रात्री १० पर्यंतची मुभा देतानाही कोरोनाची परिस्थिती पाहून यावेळेत बदल करण्याचे अधिकार महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.