महाराष्ट्रराजकारण

राज्यात आणखी किती दिवस लॉकडाउन ठेवणार?- उच्च न्यायालय

कोरोनामुळे राज्यात आणखी किती दिवस लॉकडाउन ठेवणार आहे, आपल्याला आता कोरोनासह जगावे लागणार आहे. अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. कोलकात्यामध्ये जनजीवन पूर्वपदावर आल्याचे उदाहरण देताना न्यायालयाने महाराष्ट्रातही हळूहळू व्यवहार पूर्ववत व्हायला हवेत, असे नमूद केले.

कोरोनास्थितीत अद्यापही सुधारणा झालेली नाही. अशा स्थितीत उपनगरी रेल्वे सेवा सुरू केल्या तर कोरोनाबाधितांच्या संख्येचा उद्रेक होईल, असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या रेल्वेतही गर्दी असल्याच्या वृत्ताकडे कुंभकोणी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. परंतु अशी स्थिती फार काळ कायम ठेवता येणार नसल्याचा पुनरुच्चार न्यायालयाने केला.

तब्बल पाच महिन्यानंतर कनिष्ठ न्यायालयासह उच्च न्यायालयाच्या प्रत्यक्ष कामकाजाला अंशत: सुरुवात झाली आहे. त्यामुळे वकील आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना उपनगरी रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी वकिलांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.