देश-विदेशराजकारण

सरकारी अधिकाऱ्यांकडून मलाही आला कनिमोळींसारखा अनुभव – पी. चिदंबरम

Newsliveमराठी -सीआयएसएफच्या एका महिला अधिकाऱ्यानं हिंदी येत नसल्यानं माझ्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, असा दावा नुकताच द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी केला होता. यावर माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यालाही सरकारी अधिकाऱ्याकडून अशाच प्रकारच्या शेरेबाजीला सामोर जावं लागलं होतं, असं त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. यावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

ट्विटरवर चिदंबरम म्हणाले, “द्रमुकच्या नेत्यांबाबत जे घडलंय हे नेहमीच घडत आलं आहे. मी सुद्धा अशा शेरेबाजीला बळी पडलो आहे. फोनवरील संवादादरम्यान आणि काहीवेळा प्रत्यक्ष समोरासमोर संभाषण करीत असताना सरकारी अधिकारी आणि काही सामान्य लोकांकडून मला हिंदीत बोलण्याचा आग्रह करण्यात आला होता. जर केंद्राला खरचं हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा भारताच्या अधिकृत भाषा म्हणून ठेवायच्या असतील तर त्यांनी सर्व केंद्रीय संस्था आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना दोन्ही भाषांमध्ये संवाद साधण्याच्या सूचना द्यायला हव्यात. केंद्र सरकारच्या पदांवर कार्यरत असलेले आणि हिंदी येत नसलेले कर्मचारी लवकर हिंदी बोलायला शिकतात. मग ज्यांना हिंदी येतं ते लवकर इंग्रजी बोलायला का शिकत नाहीत? असा सवालही त्यांनी केला आहे.”