महाराष्ट्रराजकारण

‘मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा’; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची गर्जना

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडत शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ धरली. सोनिया गांधी यांच्या बैठकीत मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे, अशी डरकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोडली. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपेतर 7 मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पाडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. बैठकीच्या सुरूवातीलाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांच्या कोरोना उपाययोजनांचं कौतुक केलं. आपण कोरोना संकटात खूप चांगलं काम करत असल्याचं ममतादीदी उद्धव ठाकरेंना म्हणाल्या.

यावर मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा असल्याचं उद्धव ठाकरेंनी अभिमानाने सांगितलं. आपण विरोधी पक्षांनी लढलं पाहिजे. घाबरून चालणार नाही. आपत्ती आली की आपण एकत्र येतो, चर्चा करतो. आपण आपत्तीची वाट कशाला बघायला हवी? आपत्ती देखील आपल्याला घाबरून राहायला हवी. हे एकत्रच आहेत, असं तिला वाटायला हवा. आपण गप्प राहायचं की लढायचं हे ठरवायला हवं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जीएसटी परताव्याचा मुद्दा उपस्थित करत केंद्राने हे पैसे लवकरात लवकरत दिले पाहिजेत तसंच कोरोना काळात केंद्राकडचे पीपीई कीट तसंच व्हेंटिलेटर मिळत राहायला हवेत, अशी अपेक्षा उद्धव यांनी या बैठकीत व्यक्त केली. काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चालू आहेत या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस व मित्र पक्षांची बैठक घेतली.