महाराष्ट्रलक्षवेधी

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थिती अजूनही कायम

सध्या विदर्भात जोरदार पाऊस आणि धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या 175 गावांमधल्या 53 हजारापेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. गेल्या काही दिवसात या चार जिल्ह्यांमधे जोरदार पाऊस आणि पूरस्थितीमुळे अनेक लोकांना याचा फटका बसला आहे.

लष्करासह 11 बचाव आणि मदत पथके चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात कार्यरत आहेत. आज नागपूर विभागातल्या 53 हजार 224 लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याचे नागपूरच्या विभागीय आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

भंडारा जिल्ह्यातल्या 76, नागपूर 61, चंद्रपूर 22, तर गडचिरोली जिल्ह्यातल्या 16 गावांना पुराचा फटका बसला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भामरागड तालुक्‍याला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना रेशन, कपडे आणि इतर जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप केले होते.