आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

महाराष्ट्रात २४ तासांत २६४ पोलीस करोनाबाधित, तर तिघांचा मृत्यू

Newsliveमराठी – देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धे समजले जाणारे पोलीस देखील करोनाच्या विळख्यात दिवसेंदिवस अडकताना दिसत आहेत. मागील २४ तासांमध्ये राज्यात २६४ पोलीस करोनाबाधित आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १२१ वर पोहचली आहे. तर, राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता ११ हजार ३९२ झाली आहे. यापैकी ९ हजार १८७ जण पूर्णपणे बरे झाले असून, २ हजार ८४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील ११ हजार ३९२ करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार १७९ अधिकारी व १० हजार २१३ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ८४ पोलिसांमध्ये २५७ अधिकारी व १ हजार ८२७ कर्मचारी आहेत.