बारामतीमहाराष्ट्रलाइफस्टाईल

रमजानच्या पवित्र महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या रूपात देवदूतच आमच्या मदतीला धावून आला

Newslive मराठी-  सर्व प्रकारची सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही असे म्हणतात. जन्मतःच अपंगत्व नशिबी आलेल्या तन्वीरच्या वडिलांनी त्याचे अपंगत्व दूर व्हावे म्हणून खूप प्रयत्न केले. पण सर्वसामान्य माणसाच्या प्रयत्नांना मर्यादा येतात त्या आर्थिक दुर्बलतेमुळे. तन्वीरच्या वडिलांचेही तेच झाले. पैशांच्या अडचणींमुळे इच्छा असून देखील मुलासाठी काहीच करता येत नव्हते. पण ह्या कठीण प्रसंगी तन्वीरला आपल्या अपंगत्वापासून मुक्ती मिळवण्यासाठी मदतीचा हात मिळाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा. एका राज्याचा मुख्यमंत्री कुण्या एका जाती, धर्माचा नसतो तर तो राज्यातील प्रत्येक नागरिकाचा असतो हे वेळोवेळी अनेक प्रसंगांमधून दिसून आले आहे आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा तन्वीर शेख ह्याचीच साक्ष आपल्याला देतो आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर गावातील तन्वीर शेख. दुर्दैवाने तन्वीरच्या वाट्याला जन्मतःच अपंगत्व आले. तन्वीरचे वडील आमिर शेख आपल्या मुलाच्या वाट्याला आलेले हे अपंगत्व पाहून दुःखी होत असत. आपल्या मुलाने सामान्य आयुष्य जगावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. शक्य ते वैद्यकीय उपचार त्यांनी तन्वीरचे अपंगत्व दूर करण्यासाठी केले. पण आर्थिक परिस्थिती बेताची होती. घर चालवण्याची जबाबदारी आमिर ह्यांच्यावरच होती. आर्थिक दुर्बलतेमुळे आपण आपल्या मुलाच्या अपंगत्वावर उपचार करू शकत नाही, हि बाब आमिर ह्यांना वेदना देणारी होती.

तन्वीरवर उपचार तर करायचे होते पण जवळ पैसे नव्हते. ह्या परिस्थितीत एका सर्वसामान्य कुटुंबाची अवस्था काय असू शकते ह्याची कल्पना आपल्याला नक्कीच आलेली असेल. अश्या प्रसंगी आमिर शेख ह्यांना आपल्या मित्राकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी विषयी माहिती मिळाली. खरंतर सरकार सामान्यांच्या मदतीसाठी अनेक योजना राबवत असते पण आपल्याला कधीकधी त्याची माहितीच नसते.

आमिर शेख ह्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्यासाठी अर्ज केला. सर्व परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ शासनाने आमिर शेख ह्यांच्या मुलाच्या उपचारासाठी एक लाख रुपये मदत देऊ केली. इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील ह्यांनी मदतीचे पत्र आमिर शेख ह्यांना सुपूर्द केले. काही काळापूर्वी आर्थिक विवंचनेत असलेल्या अमीर शेख ह्यांना ह्या मदतीमुळे मोठा आधार मिळाला. आपल्या मुलावर चांगले उपचार करण्यासाठी लागणारी आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या रूपाने आमिर शेख ह्यांच्यापर्यंत पोहोचवली.

मंत्रालयातील वैद्यकीय कक्षाचे प्रमुख, विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेटे ह्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे गरजुंना तात्काळ वाटप होईल ह्याची खबरदारी घेतली. मदत मिळण्यापेक्षा महत्वाचे असते ती मदत तात्काळ मिळणे आणि हि जबाबदारी विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेटे अतिशय कार्यक्षमपणे सांभाळतांना दिसत आहेत.

रमजानच्या पवित्र महिन्यात देवदूतच आपल्या मदतीला धावून आला अशी भावना आमिर शेख ह्यांनी ह्यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची वेळेवर मिळलेली मदत व त्यामुळे मिळालेले योग्य उपचार ह्यामुळे तन्वीरचे आयुष्य सुसह्य होणार आहे.