कृषीदेश-विदेश

उसाच्या हमीदरात वाढ ; क्विंटलसाठी आता २८५ रुपये देणे बंधनकारक

Newsliveमराठी – ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या हंगामासाठी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात (एफ.आर.पी.) प्रति क्विंटल १० रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने घेतला. आता क्विंटलला २८५ रुपये भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे. या दरवाढीतून शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागणार नाही, अशी टीका साखर उत्पादक संघटनांकडून करण्यात आली.

उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात २०१८ मध्ये वाढ करण्यात आली होती. गेल्या वर्षी मात्र दरवाढ करण्यात आली नव्हती.आता दहा रुपयांची दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांना २८५ रुपये रास्त आणि किफायतशीर दर मिळेल. उसाच्या दरात वाढ करण्याची शिफारस अन्न मंत्रालयाने केली होती. ती मागणी मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मान्य केली. नियमानुसार केंद्र सरकारने निश्चित केलेला रास्त आणि किफायतशीर किमान दर साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना देणे बंधनकारक असते. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणा या तीन राज्यांमध्ये राज्य सरकारकडून ऊसाचा दर निश्चित केला जातो. मात्र हा दर केंद्राने निश्चित केलेल्या रास्त आणि किफायतशीर दरापेक्षा जास्त असणे आवश्यक असते. महाराष्ट्रात मात्र केंद्राच्या रास्त आणि किफायतशीर दराप्रमाणे उसाला दर दिला जातो. काही कारखाने यापेक्षा जास्त दर देतात.