महाराष्ट्रराजकारण

कृषी विधेयकाच्या निषेधार्थ आज भारत बंद

मोदी सरकारच्या कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी देशातील विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांनी शुक्रवारी भारत बंदची हाक दिली आहे. विशेष म्हणजे पंजाब आणि हरियानातील ३१ शेतकरी संघटनांनी या आधीच या विधेयकांविरोधात दंड थोपटले आहेत. आखिल भारतीय शेतकरी युनियन, भारतीय किसान युनियन, आखिल भारतीय किसान महासंघ आणि आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आदी शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.

विधेयकाला विरोध करताना सुरु असलेल्या या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. आंदोलनकांनी रेल्वे रोखून धरल्या असून रुळावरच ठिय्या मांडला आहे.

महाराष्ट्रातील काही शेतकरी संघटनांनी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, नॅशनल ट्रेड्स युनियन काँग्रेस, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन, हिंद मजदूर सभा, ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर आणि ट्रेड युनियन कोऑर्डिनेशन सेंटर या कामगार संघटनांनी शेतकऱ्यांचा आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

पंजाबमध्ये अमृतसर-जयनगर क्लोन ट्रेन रद्द केली आहे. शेतकरी संघटनांनी एक ऑक्टोबरपासून अनिश्चित काळासाठी रेल्वे रोको करण्याचा इशारा दिला आहे. हरियाणातही 13 ट्रेन काही काळासाठी रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. हे आंदोलन देशभर पेटण्याची शक्यता आहे.