आरोग्य महाराष्ट्र

संसदेत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती; नवीन वर्षात देशात कोरोनाची लस उपलब्ध होणार

भारतात नवीन लसींसाठी चाचण्या फेज 1, फेज 2 आणि फेज 3मध्ये पोहोचल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. ते संसदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली एक तज्ज्ञांचा गट याचा अभ्यास करीत आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीस ही लस भारतात उपलब्ध व्हावी, त्यासाठी आम्ही डब्ल्यूएचओबरोबर समन्वय साधत आहोत.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या टप्प्यांची माहिती देताना ते म्हणाले की, सुरुवातीला फक्त एक चाचणी प्रयोगशाळेची सुविधा होती. परंतु आता ती 1700 पर्यंत वाढविण्यात आली आहे. आरोग्यमंत्री म्हणाले, आज देशात 110 कंपन्या पीपीई किट बनवतात. देशात व्हेंटिलेटर उत्पादकांची संख्याही 25 झाली आहे. एन 95 मास्कचे 10 मोठे उत्पादक देखील आहेत. यापूर्वी आम्हाला व्हेंटिलेटरच्या आयातीवर अवलंबून राहावे लागायचे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने कधीही राज्यांमध्ये भेदभाव केलेला नाही.

त्यांनी कबूल केले की, या लॉकडाऊनमुळे काही काळ प्रवासी कामगारांची गैरसोय झाली होती, परंतु केंद्रीय गृह मंत्रालयाने जवळपास 64 लाख स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गावी ट्रेनमधून नेण्यासाठी वेळेवर पाऊल उचलली. डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, कोरोनाचा मृत्यूदर संपूर्ण जगात सर्वात कमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *