खेळमहाराष्ट्र

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर, पहिला सामना मुंबई-चेन्नई मॅचने होणार

कोरोनामुळे आयपीएल होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर अनेक अडथळ्यांना पार करत यंदाच्या आयपीएल हंगामाचा नारळ 19 सप्टेंबरला मुंबई आणि चेन्नई लढतीने फुटणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने वेळापत्रकाची घोषणा केली. सर्व टीम दुबईत दाखल झाल्या आहेत.

मुंबई-चेन्नई ही मॅच 19 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता अबूधाबी इथे सुरू होईल. रविवारी दुबईत दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब समोरासमोर असतील. सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स एकमेकांसमोर उभे असतील.

चेन्नईचा संघ आणि व्यवस्थापनातील 13 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने चेन्नई सलामीची लढत खेळणार की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु बहुतांश सदस्य कोरोनाच्या दुसऱ्या चाचणीत निगेटिव्ह आढळल्याने चिंता मिटली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीला चाहत्यांना पहिल्यांदाच लाईव्ह खेळताना पाहता येणार आहे. यामुळे अजूनच उत्सुकता वाढली आहे.