खेळमहाराष्ट्र

आयपीएलला आज सुरुवात, आज मुंबई विरुद्ध चेन्नई सलामीचा सामना

अमिरातीत शनिवारी सुरू होत असलेल्या आयपीएल स्पर्धेचा सलामीचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स व महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात मुंबईला वेगवान गोलंदाज लसित मलिंगाची तर, चेन्नईला सुरेश रैनाची उणीव भासणार आहे. मात्र, याहीपेक्षा मोठे आव्हान असेल ते उष्ण वातावरण व येथील मैदानावरच्या नव्या कोऱ्या खेळपट्टीचे.

मार्चमध्ये होणारी ही स्पर्धा यंदा करोनाच्या धोक्‍यामुळे लांबणीवर टाकली गेली व आता आखातात हा धोका कमी असल्याने सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांचे खेळाडू येथे दाखल झाल्यावर सुरुवातीला काही दिवस विलगीकरणात राहिले व त्यानंतर त्यांचा सराव सुरू झाला.

चेन्नई संघातील दीपक चहर व ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील काही सदस्य मिळून एकूण 13 जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यातून ऋतुराज वगळता सर्व जण करोनातून मुक्‍त झाले. त्यानंतर चेन्नई संघाचा सरावही सुरू झाला. त्यात धोनीसह सर्व खेळाडू पूर्ण तंदुरुस्त असल्याने मुंबईसमोर त्यांची फलंदाजी कशी रोखायची याचेच आव्हान राहणार आहे.