आरोग्यमहाराष्ट्र

लसीसाठी ८० हजार कोटी आहेत का? पुनावाला यांचा प्रश्न

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. यामुळे कोरोना लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता भारतातील प्रत्येकाला कोरोनाची लस देण्यासाठी सरकारकडे पुढील वर्षभरात ८० हजार कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतील का, असा प्रश्न सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. हा निधी उभारण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर असेल, असे पुनावाला यांनी म्हटले आहे. याबद्दलचे ट्विट पंतप्रधान कार्यालय म्हणजेच नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय या दोघांना टॅग केले आहे. यामुळे आता हे एक मोठे अर्थिक आव्हान आपल्यापुढे असणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविशिल्ड, कोडाजेनिक्स आणि नोव्हावॅक्स या तीन लसींचे उत्पादन केले जाणार आहे. सीरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष सीरम इन्स्टिट्यूटच्या उत्पादनाकडे लागले आहे. ग्रेट ब्रिटनमधील आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी केलेल्या करारांतर्गत विकसित झालेल्या लसीच्या चाचण्याही सीरमतर्फे सुरू झाल्या आहेत. लसींच्या चाचण्या पूर्ण होऊन सन २०२१ च्या जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत ती प्रत्यक्ष लोकांना उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपल्याला लवकर लस उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारकडूनही प्रयत्न सुरू आहेत. पुनावाला यांनी हा प्रश्न उपस्थित करण्यामागचे कारणही सांगितले आहे. त्यात पुनावाला म्हणतात, ”मी हा प्रश्न विचारला कारण, भारतासह भारताबाहेरील लस उत्पादक कंपन्यांसोबत आपल्या देशाची आवश्यकता व त्यानुसार उत्पादन आणि वितरणाचे नियोजन करावे लागणार आहे.” याचे नियोजन करावे लागेल, असेही ते म्हणाले.