महाराष्ट्रराजकारण

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया देणे योग्य नाही- संजय राऊत

सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी जोर धरत असतानाच सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आज सुनावणी झाली. त्यानुसार, सीबीआयने या घटनेचा तपास करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

त्यानंतर यावरुन आता राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या निकालावरून राज्य सरकारवर विरोधक जोरदार टीका करत आहेत. शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया आली आहे.

राजकीय प्रतिक्रिया न्यायालयाच्या निकालावर देणे योग्य नाही, कायदेशीर बाब आहे, हे प्रकरण न्यायालयाच्या अख्यारित आहे. न्यायालयाच्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याचे महाधिवक्ता बोलू शकतात, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत याबाबत म्हणाले की, महाराष्ट्र कायद्याचे राज्य असून ते एक न्याय आणि संघर्ष करणारे राज्य आहे. कधी कोणावर राज्याने अन्याय केला नाही. संपूर्ण निकाल हाती आल्याशिवाय त्यावर मत व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे करणे हे एक षडयंत्र आहे. अत्यंत प्रामाणिकपणे मुंबई पोलिसांनी त्यांचा तपास केला आहे. जगभरात मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा आहे. आपल्याच राज्यातील नेते मुंबई पोलिसांची बदनामी करत असतील तर ते राज्याचे खच्चीकरण असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.