महाराष्ट्रराजकारण

‘कल तेरा घमंड टुटेगा’, कंगणाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख

अभिनेत्री कंगणा राणावतने मुंबईतील घरी पोहोचताच पुन्हा एक व्हीडिओ ट्विट करून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. या व्हीडिओमध्ये बोलताना कंगणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला. आधीच शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आक्रमक असताना कंगणाने उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्याने आता आणखीनच वातावरण पेटण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे तुला काय वाटतं. फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडून तुम्ही बदला घेतला आहे. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं हे मला आज कळालं. आज मी या देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्या नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार. आपल्या देशवासियांना जागरुक करणार. ही क्रूरता आणि दहशतवाद माझ्यासोबत झाला हे चांगलं आहे, कारण याचा काही अर्थ आहे. जय हिंद.जय महाराष्ट्र, असं कंगणाने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

कंगणाने मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने आधीच वातावरण पेटलं असताना कंगणाने अजुन एक वादग्रस्त वक्तव्य केले. कंगणाला मुंबई विमान तळावरून घरी जाताना मुंबई पोलिसांनीच मदत केली होती आणि आता तिच्या अशा वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ माजण्याची शक्यता आहे.