महाराष्ट्रराजकारण

कंगनाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा; “माझे घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडे लक्ष दिले असते तर…”

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधत आहे. तिने परत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भिंवडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीवरून कंगनाने हल्लाबोल केला आहे. बेकायदेशीररित्या माझे घर पाडण्यापेक्षा त्या इमारतीकडे लक्ष दिले असते तर ५० जणांचे जीव वाचले असते, असे कंगनाने म्हटले आहे.

यासंदर्भात कंगनाने ट्विट केले आहे. ती म्हणाली, “उद्धव ठाकरे, संजय राऊत, मुंबई महानगरपालिका ज्यावेळी माझे घर बेकायदेशीर पद्धतीने तोडत होते. त्यावेळी या इमारतीकडे लक्ष दिले असते तर आज हे जवळपास ५० लोक जीवंत असते. एवढे जवान तर पुलवामा, पाकिस्तानमध्ये मारले नाहीत, तेवढे आपल्या निष्काळजीमुळे मरण पावले. मुंबईचे काय होईल देवाला ठाऊक?”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर उघडपणे बोलणाऱ्या कंगनाने मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखविणारे वक्तव्य केले होते. तसेच, मुंबईची तुलना पीओकेशी (पाकव्यप्त काश्मीर) केली होती. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबईत भीती वाटत असेल तर तिने मुंबईत येऊ नये, असे म्हटले होते.