महाराष्ट्रराजकारण

कंगना राणावतला मुंबईत येताच क्वारंटाईन करणार- महापौर

शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना रणावत यांच्यात सध्या जोरदार वाद सुरू आहेत. रोज ते एकमेकांवर टीका करत आहेत. आता अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत येताच तिला गृह विलगीकरणात पाठवले जाईल, असे मुंबई महानगर पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगीतले आहे. माध्यमांशी संवाद साधताना पेडणेकर यांनी ही माहिती दिली.

महापौर पेडणेकर म्हणाल्या की, कंगना राणावत ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. त्यामुळे नियमानुसार तिला क्वारंटाईन केले जाईल. परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीला नियमानुसार गृह विलगीकरणात पाठवले जाते. त्यानुसार तिला गृह विलगीकरणात रहावे लागेल. तसेच तिच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्काही मारला जाईल, असे त्यांनी सांगीतले.

हे सर्व आयसीएमआरच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार महापालिका प्रशासन कार्यवाही करेल असेही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. यामुळे आता कंगना यावर काय प्रतिक्रिया देणार हे लवकरच समजेल. सध्या सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी कंगना अनेकांवर आरोप करत आहे.