कोरोनामहाराष्ट्रराजकारण

किशोरी पेडणेकरांनी पदाचा गैरवापर करून कंत्राट दिले; मनसेचा खळबळजनक आरोप

Newsliveमराठी – मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अनेक ठिकाणी करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केंद्र तयार करण्यात आले होते. मात्र, उभारण्यात आलेल्या विलगीकरण केंद्राच्या कामावरून भाजपापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. महापौरांनी पदाचा गैरवापर करून कंत्राट दिले असून, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बृह्नमुंबई महापालिकेचे आयुक्तांना पत्र दिलं, त्यात महापौरांनी पदाचा गैरवापर करत कंत्राट दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयुक्तांना दिलेल्या पत्रात संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे की, “करोना महामारीच्या काळात वरळीतील एन.एस.सी.आय.डोम येथे उभारण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात होत असलेल्या भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराबाबत तक्रार मिळाली. सदर तक्रारीची शहनिशा केली असता सत्ताधारी शिवसेनेच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांचा मुलगा साईप्रसाद किशोर पेडणेकर व त्यांचे जावई गिरीश रमेश रेवणकर (अतिरिक्त संचालक) असलेल्या खिस कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीला तृतीय श्रेणी व चतुर्थ श्रेणी कामगार पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले. कोणतीही निविदा प्रकिया न करता फक्त ई कोटेशनच्या माध्यमातून कामं दिली गेलेली आहेत. तसेच बृह्नमुंबई महापालिका अधिनियम १९८८ कलम १६(१)फ अन्वये ज्या नगरसेवकांचा कंत्राटामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्यास त्याचे नगरसेवक पद रद्द करण्याची तरतूद आहे. म्हणूनच मुंबईच्या महापौरांनी पदाचा गैरवापर करून दिलेल्या कंत्राटाची चौकशी करण्यात यावी, ही विनंती,” अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.