महाराष्ट्रलक्षवेधीलेख

“रस्त्यावरच गाडीमध्ये डिलिव्हरी करुन मातेला व बाळाला जीवनदान”

Newslive मराठी-  ऐश्वर्या जगताप (वय-26) या ओमनी गाडीने पाटस ते दौंड असा प्रवास करत होत्या. यावेळी त्यांना अचानक प्रस्तुती कळा सुरु झाल्या. अर्ध्या  रस्त्यात येईपर्यंत बाळाचे डोके बाहेर आले होते.

मात्र बाळ अर्धवट अवस्थेमध्येच आईच्या पोटात अडकले होते. तसंच आईच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. ती वेदनेने कळवळत होती. सोबत असलेले नातेवाईक घाबरलेले होते. यावेळी त्यांनी समयसुचकता दाखवत वायरलेस फाटा येथील लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. संदिप गावडे यांना बोलावून घेतले. दौंडच्या हॉस्पीटलला पोहचेपर्यंत आई आणि बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो, हे समजून गावडे यांनी क्षणाचाही विलंब न करता रस्त्यावरच गाडीमध्येच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला.

सोबत कसलीही उपकरणे नसताना एका सिस्टरच्या मदतीने डिलिवरी करुन ते बाळ सुखरूप बाहेर काढले. परंतु त्या बाळाच्या मानेभोवती नाळेचा वेढा असल्यामूळे व प्रवासात बाळ आईच्या पोटात अर्धवट अवस्थेत खूप वेळ अडकून राहिल्यामुळे बाळाच्या नाका तोंडात शी गेली होती. त्यामुळे बाळ बाहेर आले तरी बेशुद्ध अवस्थेमध्येच होते. अश्या वेळी बाळ लगेच रडणे खूप आवश्यक असते नाहीतर बाळाच्या जीवास धोका होवू शकतो.

पण काहीही केले तरी बाळ रडत नव्हते आणि आता यापुढे खरी डॉक्टरांची सोबत काहीच उपकरणे नसताना बाळ वाचवण्याची धडपड सुरु झाली. शेवटी तोंडानेच क्रूत्रिम श्वासोच्छवास दिला. खूप वेळ कार्डियाक मसाज करुन शेवटी बऱ्याच वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि डॉक्टरांसोबतच, नातेवाईक व रस्त्यावर उपस्थित सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

यानंतर बाळाला व्यवस्थित स्वच्छ करुन बाळ कापडात गुंडाळून बाळाला आईच्या हातात दिले. त्यांच्या कडून कसलाही मोबदला न घेता आई व बाळ पुढील उपचारासाठी दौंड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले.

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi