महाराष्ट्रराजकारण

ग्रामीण भागात घरांच्या मालमत्तेवर मिळणार कर्ज; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. यामुळे अनेक अडचणी येत आहेत. यातच आता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या 6 डिसेंबर 2017 रोजीच्या एका आदेशान्वये ग्रामस्थांच्या मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणीपत्रक नमुना 8 वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली होती.

आता हा आदेश रद्द करण्यात येत असून त्यामुळे ग्रामस्थांना घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून बॅंका, पतसंस्था किंवा इतर अधिकृत वित्तसंस्थांकडून कर्ज घेता येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोरोनामुळे सध्या सर्वच जण अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आदीजण वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन पुन्हा आपले आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. या निर्णयामुळे आता नागरिकांना दिलासा भेटला आहे.