कोरोनामहाराष्ट्र

व्यापार्‍यांच्या आग्रहाने हटवावे लागले पुण्यातले लॉकडाऊन- अजित पवार

देशात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आढळत आहेत. यामुळे पुण्यात लॉकडाऊन का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्याचे लॉकडाऊन हळूहळू हटवण्याचे मुख्यमंत्र्यांचे मत होते. मात्र, व्यापार्‍यांच्या आग्रहामुळे पुण्यातले लॉकडाऊन हटवावे लागले, अशी कबुली उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.

पुण्यातील २५ ते ३० टक्के नागरिक मास्कचा वापर करत नाहीत, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. अजित पवार यांच्यासह पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इतर संबंधित अधिकार्‍यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

व्यापारी मंडळी लॉकडाऊन उठवायला सांगत आहेत. मग लॉकडाऊन का उठवत नाही. व्यापारी वर्ग सतत विनंती करत होता. व्यापारी वर्गाच्या आग्रहामुळे लॉकडाऊन उठवावा लागला, असं अजित पवार यांनी सांगितले. यावेळी ऑक्सिजनचे सिलिंडर राज्यातल्या काही भागांत मिळत नाहीत. वैद्यकीय उपचारासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. त्यामुळे त्याचे प्रमाण वाढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यात आरोग्य यंत्रणा देखील अपयशी ठरली आहे. व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.