महाराष्ट्रराजकारण

सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज- देवेंद्र फडणवीस

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यास सुप्रीम कोर्टाने सकारात्मक निकाल दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

सुप्रीम कोर्टाचा निकाल हा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा आहे असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. फडणवीस यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा निर्णय, या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्याच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलं आहे. अलीकडेच बिहार विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांना भाजपानं निवडणूक प्रभारी केले आहे. सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकारला घेरण्यासाठी भाजपानं ही रणनीती अवलंबली असल्याची चर्चा आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानी सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं अशा सूचनादेखील न्यायालयानं केल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती.