कोरोनाराजकारण

गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकरच करोनामुक्त होईल – अजित पवार

Newsliveमराठी – श्रीगणरायांच्या आशिर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र लवकरच करोनामुक्त होईल असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “राज्यावरील करोनाचे संकट दूर कर… महाराष्ट्राला लवकर करोनामुक्त कर,” असे साकडे अजित पवार यांनी गणपती बाप्पांना घातले आहे. बाप्पांच्या आगमनाने घराघरात आनंद, उत्साह, चैतन्याचे भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. भक्तीमय वातावरणात साजरा होत असलेला यंदाचा गणेशोत्सव करोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन साजरा करावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

“कोरना संकटामुळे गणेशभक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव यंदा गर्दी टाळून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक जाणीवेतून गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी, आनंद, उत्साह, भक्तीमध्ये जोश कायम आहे. त्यात उणीव नाही. बुद्धीची देवता असलेल्या श्रीगणरायांच्या समस्त भक्तांनी श्रीगणेशोत्सवासंदर्भात घेतलेल्या कौतुकास्पद निर्णयामुळे राज्यातील करोनाचा संसर्ग रोखला जाईल तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकर करोनामुक्त होण्यास मदत होईल, असा मला विश्वास आहे,” असंही अजित पवार म्हणाले. गणेशोत्सव काळात सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी सर्वांना केलं आहे.