खेळबातमी

महेंद्र सिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Newsliveमराठी – धडाकेबाज फलंदाजी आणि कुशल यष्टीरक्षणांमुळे भारतीय संघाला अनेक सामन्यांत विजय मिळवून देणारा आणि आपल्या कुशल नेतृत्वावर देशाला टी-२० विश्वचषक, आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या तीन मोठ्या स्पर्धा जिंकुन देणारा कॅप्टन कुल महेंद्र सिंग धोनीने आज आपल्या कारकिर्दीमधील सर्वात मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

भारतीय संघाला पहिल्यांदाच कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत अव्वलस्थानावर पोहोचवणारा कर्णधार म्हणून मान मिळवणाऱ्या धोनीने कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती स्वीकारली होती. मात्र टी-२० आणि एकदिवसीय या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो मैदान गाजवत होता. पण गतवर्षी झालेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकानंतर धोनीला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नव्हती. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होत्या.

धोनीने 90 कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना 38.09 च्या सरासरीने 6 शतके व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. तर 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 50.57 च्या धडाकेबाज सरासरीने 10 हजार 773 धावा फटकावल्या. त्यामध्ये 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. तर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये माहीने 98 सामन्यांत 1617 धावा केल्या.