इंदापूरमहाराष्ट्र

पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे इंदापूर तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान

इंदापूर तालुक्यात आज झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी लॉकडाऊनमुळे अगोदरच संकटात आहे, आता या पावसामुळे अजूनच संकटात सापडला आहे. परिसरातील सणसर, भवानीनगर परिसरात मोठा पाऊस झाला आणि नंतर जोरदार वाऱ्यामुळे ऊस, डाळींब तसेच टोमॅटो या पिकांचे मोठे नुकसान झाले. उसाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. मका देखील भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी बाळासो निंबाळकर यांनी केली आहे.

परिसरात बागायती भाग असल्यामुळे उसाचे पीक तसेच मोठ्या प्रमाणावर डाळींबाच्या बागा आहेत. संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे त्या पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे आहेत त्या भाज्यांना बाजारभाव नाही. दुधाचे भाव पडले आहेत. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आता आज झालेल्या या पावसामुळे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.