कोरोनादेश-विदेशराजकारण

राज्यातील कोविड रुग्णालये कॅशलेस करा; नितेश राणेची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

Newsliveमराठी – सध्या राज्यात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसंच खासगी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना मोठी बिलं दिल्याच्या तक्रारी काही दिवसांपासून समोर आल्या होत्या. दरम्यान, भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी राज्यातील कोविड रुग्णालयं सक्तीनं कॅशलेस करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहिलं आहे.

“करोना महामारीवर सध्या कोणता ठोस उपाय आलेला नाही, तसंच गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात लॉकडाउन हा एकमेव पर्याय राबवला जात आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश लोकांचा रोजगार गेला आहे. ज्यांच्याकडे रोजगार आहे त्यांना तो कपात होऊन मिळत आहे. काही ठराविक कंपन्याच आपल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देत आहेत. अशा परिस्थितीत जे करोनाबाधिक रुग्ण होत आहेत त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे,” असं राणे यांनी पत्रात नमूद केलं आहे.