बातमीमहाराष्ट्रशैक्षणिक

मराठा तरुणांना आर्थिक दुर्बल 10 टक्के आरक्षण नाही; सरकारी जीआरवर विनोद पाटील आक्रमक

Newslive मराठी-  मराठा आरक्षणाचा वाद काही केल्या संपताना दिसत नाही. राज्य सरकारने मराठा समाजासह इतर आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या समाज घटकांना आर्थिक मागास घटकांच्या आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचं परिपत्रक काढलं आहे. त्यामुळे यापुढे राज्यात मराठा समाजाला आर्थिक मागास घटकांतर्गत आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.

याविरोधात मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी राज्यसरकार एकप्रकारे इशारा दिला आहे. राज्य सरकारने 2 दिवसात हे परिपत्रक मागे घ्यावे, अन्यथा कायदेशीर गोष्टींना सामोरे जा, असा अल्टिमेटम विनोद पाटील यांनी सरकारला दिला आहे.

राज्य सरकारनने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, ‘राज्यात अनेक ठिकाणी आरक्षणाचा लाभ मिळत असणाऱ्यांकडूनही आर्थिक मागास घटकांच्या आरक्षणाचा लाभ घेतला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. कोणत्याही आरक्षणाचा लाभ न मिळणाऱ्या घटकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे यापुढे मराठा समाजाला देखील राज्यातील शासकीय सेवा आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाच्या जागा यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.

पाटील म्हणाले, ‘राज्य सरकारने असे जीआर आणि परिपत्रकं काढण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची भक्कम बाजू मांडली पाहिजे. तेथे लागणाऱ्या गोष्टींची तयारी केली पाहिजे. आधीच मराठा समाजासमोरील अडचणी वाढलेल्या आहेत. त्यातच आपणही अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करु नये. आरक्षण टिकवण्यासाठी जे जे करता येईल ते ते राज्य सरकारने करावं. हे परिपत्रक 2 दिवसात मागे घ्यावं, अन्यथा त्यांना कायदेशीर गोष्टींना सरकारला सामोरं जावं लागेल.’

घटनेने हा अधिकार दिला आहे याची मी राज्य सरकारला आठवण करुन देतो. कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्या आरक्षणाचे निकष पूर्ण करावे लागतात. परंतु अशाप्रकारे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी निर्बंध आणणे हे अतिशय चुकीचं आहे. हे आरक्षण जातीच्या आधारावर नसून वर्गाच्या आधारावर आहे., असं विनोद पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी केला नवा खुलासा

-मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जोरदार टीका

-15 लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन- काँग्रेस