महाराष्ट्रराजकारण

संजय राऊत यांच्या वक्तव्याचा मेडिकल असोसिएशनकडून निषेध; राजीनाम्याची केली मागणी

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरला काय कळतं. डॉक्टरपेक्षा कंपाउंडर जास्त जाणतात.’ असे वक्तव्य केले. त्याचा डॉक्टरांसाठी काम करणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनकडून निषेध करण्यात आला असून संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण देताना कोरोना काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत असून माझ्याकडून त्यांचा अपमान झालेला नाही असं म्हटलं आहे. दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंबंधी पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.

संपूर्ण जग सध्या कोरोना संकटाचा सामना करत आहे याची तुम्हाला जाणीव आहेच. आरोग्य कर्मचारी फक्त आपला स्वत:चा नाही तर त्यांच्यावर अवलंबून असणारी मुलं, जोडीदार, आई-वडील यांचाही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत सरकार आणि राजकारण्यांनी आमच्या बाजूने उभं राहावं अशी अपेक्षा आहे.

संजय राऊत यांनी कंपाऊंडरला डॉक्टरपेक्षा जास्त कळतं असं म्हटल्याने आम्ही अस्वस्थ आहोत. आम्ही त्यांच्या या वागण्याचा निषेध करत असून राजीनाम्याची मागणी करतो. अशा नकारात्मक आणि अपमानजनक वक्तव्यामुळे आम्ही डॉक्टर पूर्ण कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणे काम करु शकत नाही. सर्व डॉक्टरांच मनोधैर्य खच्चीकरण झालं असून तुम्ही योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षा आहे. अशी मागणी त्यांनी केली आहे.