बातमीमहाराष्ट्र

शिवजयंतीचे नियोजन करण्यासंदर्भात मनपाची बैठक संपन्न

Newslive मराठी-  पुणे महापालिकेच्या वतीने आगामी शिवजयंतीचे नियोजन करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली.  ही बैठक पुणे मनपाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिका भवन येथे पार पडली. महानगरपालिकेतर्फे शिवजयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी एकत्रितरित्या मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. यामध्ये शहरातील अनेक शिवजयंती उत्सव मंडळे, विविध शैक्षणिक व इतर संस्था, ट्रस्ट, कामगार, संघटना, व्यक्ती यात सहभागी होतात.

या बैठकीत शिवजयंतीनिमित्त चित्रकला, निबंध, वक्तृत्व, ढोल – लेझीम, लाठीकाठी, मल्लखांब, शरीरसौष्ठव, मर्दानी खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात यावेत, शिवसंवर्धन आठवडा पर्यावरण संवर्धन करण्यासाठी साजरा करावा अशा विविध सूचना सुचविल्या आहेत.

शिवजयंतीनिमित्त सर्व शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन उत्साहाने शिवजयंती साजरी करण्याचे व पुणे शहरातील शिवजयंती महोत्सव हा दिमाखदार व संपूर्ण महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा व्हावा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू असे आवाहन करण्यात आले आहे.

याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, शिवसेना पक्षनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक राहूल भंडारे, दीपक पोटे, नगरसेविका दिपालीताई धुमाळ, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) शांतनू गोयल, सहायक आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, शिवजयंती उत्सव मंडळाचे, विविध संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मनपातील इतर अधिकारी उपस्थित होते.