महाराष्ट्रराजकारण

मोदींचा 70 वा जन्मदिवस दणक्यात होणार साजरा; पक्षाकडून जोरदार तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबरला येणारा ७० वा वाढदिवस देशभरात जोरदार साजरा केला जाणार आहे.”आत्मनिर्भर’ या संकल्पनेभोवती देशभरात आरोग्य नियम पाळून पण दणक्‍यात साजरा करण्याची योजना भाजपने आखली आहे. याला जोडूनच येणाऱ्या जनसंघ नेते दीनदयाळ उपाध्याय व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत आत्मनिर्भर थीमअंतर्गत हे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या आठवड्यात पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक बोलावून मोदींचा वाढदिवस साजरा करण्याबाबत विचारमंथन केले. नरेंद्र मोदींना १७ सप्टेंबरला ७० वर्षे पूर्ण होतील. मागील वर्षी पक्षाने यानिमित्त देशभरात सेवा सप्ताह साजरा केला होता.

यावर्षी कोरोना महामारी असल्याने यानिमित्त रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिरे, मास्क वितरण, लॉकडाउनमुळे रोजगार गमावलेल्या व इतरही गरीबांना अन्नदान आदी उपक्रम राबविण्याचे भाजपचे नियोजन आहे. यासाठीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.