महाराष्ट्रराजकारण

मोदी सरकार शेतकऱ्यांच्या डोळ्यांत रक्ताचे अश्रू आणत आहे- राहुल गांधी

शेती विधेयकावरून सध्या दिल्लीत जोरदार राजकारण सुरू आहे. हे विधेयक राज्यसभेत मोठ्या गोंधळात मंजुर करण्यात आले. विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या गोंधळ, गदारोळ आणि रणकंदनात रविवारी राज्यसभेत कृषी उत्पादने व्यापार व वाणिज्य आणि शेतकरी दरहमी ही विधेयके आवाजी मतदाराने मंजूर करण्यात आली. या प्रकरणावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक निशाणा साधला आहे.

‘जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणत आहे. कृषी विधेयकाच्या रूपाने सरकारने शेतकऱ्यांविरोधात मृत्यूचे फर्मान काढत लोकशाहीला लाज आणली आहे, असे राहुल गांधी म्हणाले. शेतकऱ्यांना मुळापासून साफ करुन मोदी सरकार श्रीमंत मित्रांचा विकास करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

कृषि विधेयकावरुन राहुल गांधी मोदी सरकारवर चांगलाच आक्रमक झाले आहेत. लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच आहे. सुरुवातीला आवाज दाबला गेला. त्यानंतर खासदारांना निलंबित करण्यात आलं आणि शेतकऱ्यांसाठी आणलेल्या काळ्या कायद्याकडे डोळेझाक करण्यात आली.

या सर्वज्ञानी सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं आहे,’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राज्यसभेत गोंधळ घातल्याने आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.