महाराष्ट्र राजकारण

मोदी सरकारचा खुलासा; एअर इंडिया कोणी विकत घेतली नाही तर कायमची बंद करणार

सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी एअर इंडियासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे. शक्य झाल्यास सरकार ही कंपनी सुरु ठेवेल.

मात्र कंपनीवर ६० हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळेच या कंपनीचे खासगीकरण किंवा ती बंद करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. विमान संशोधन विधेयक २०२० राज्यसभेमध्ये सादर करण्याआधी पुरी यांनी सभागृहाला ही माहिती दिली. एकीकडे कंपनी बंद करण्याचे वक्तव्य करतानाच दुसरीकडे पुरी यांनी या कंपनीला लवकरच नवा मालक मिळेल आणि त्याचे उड्डाण यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच कंपनीसाठी लावण्यात येणारी बोली ही कंपनीच्या अस्तित्व मुल्यावर आधारित नसून एंटरप्राइझ मुल्यावर आधारित असणार आहे. सरकारने एअर इंडियासाठी बोली लावण्याची मर्यादा दोन महिन्यांनी वाढवली आहे. आता इच्छुक कंपन्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत एअर इंडियासाठी बोली लावता येणार आहे. करोनामुळे जगभरातील आर्थिक व्यवहारांवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच सरकारने कंपनीच्या व्यवहारासंदर्भातील वेळ दोन महिन्यांनी वाढवून दिला आहे. सरकारी विमान कंपनीमधील भागीदारी विकण्याची प्रक्रिया २७ जानेवारी २०२० पासून सुरु करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *