कोरोनादेश-विदेश

सैन्याला पहिले ५० लाख डोस देण्याचा मोदी सरकारचा विचार

Newsliveमराठी – जगातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे सर्वाचं लक्ष करोनावरील लसीकडे लागलं आहे. भारत सरकार करोना लस खरेदी करण्याचा विचार करत असून पहिल्या टप्प्यात ५० लाख डोस खरेदी करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारकडून करोना लस मिळण्याचा पहिला मान करोना योद्धा, भारतीय सैन्य आणि विशिष्ट श्रेणीतील लोकांना दिला जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारचं संपूर्ण लक्ष लसीचं पुरवठा साखळी आणि वितरणावर आहे. केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात लसीचं वितरण करण्याची योजना आखत आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत करोना लस पोहोचावी. वर्षाअखेर किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला करोना लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे.

सोमवारी करोना लस विकसित करणाऱ्या कंपन्यांसोबत झालेल्या बैठकीत नीती आयोग सदस्य व्ही के पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या ग्रुपने कंपन्यांना करोना लसची निर्मिती, किंमत तसंच सरकार त्यासाठी कसा पाठिंबा देऊ शकतं यासंबंधी प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं आहे.