महाराष्ट्रशैक्षणिक

विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार- धनंजय मुंडे

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना वसतिगृह भत्ता अनुदान वाटप करण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात हा निधी संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज सांगितले आहे.

महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले आणि वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असूनही केवळ वसतिगृहातील रिक्त जागांअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना हे अनुदान देण्यात येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, असे या वसतिगृह सानुग्रह अनुदान योजनेचे नाव आहे. चालू शैक्षणिक वर्षात या योजनेसाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापैकी ३५ कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आल्याचेही मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. यामुळे आता अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.