कोरोनामहाराष्ट्र

नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

सर्व राज्यात परिचीत असलेले धडाकेबाज नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ही माहिती ट्विटरवरून दिली आहे. त्यांनी स्वत: गृहविलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 14 दिवसांत आपल्या संपर्कात ज्या व्यक्ती आल्या असतील त्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असेही मुंढे यांनी म्हटले आहे.

कोरोनाविरूद्धची लढाई आपण पुढचे काही दिवस घरातूनच लढणार असल्याचेही ते म्हणाले आहे. आपण हे युद्ध जिंकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तुकाराम मुंढे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मी असिम्पटमॅटीक असून नियम आणि निर्देशानुसार स्वत:ला विलग करण्याचा निर्णय घेतला आहे. माझी सर्वांना विनंती आहे की गेल्या 14 दिवसांत जे माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी.

नागपुरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे हे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यांनी यासाठी वेगवेगळ्या योजना देखील केल्या आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी बेड उपलब्ध व्हावेत, रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाचं गठनही केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राजकीय नेते विरुद्ध तुकाराम मुंढे असा राजकीय सामना देखील रंगला होता.