कोरोनाराजकारण

२३ तासांच्या प्रवासानंतर पोहोचल्या नवनीत राणा मुंबईत

Newsliveमराठी – कोरोनाच्या उपचारासाठी नागपूरहून मुंबईसाठी निघालेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा २३ तासांच्या सलग प्रवासानंतर लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांना लीलावतीच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचा ताप उतरला नसून श्वसनाचा त्रास आणि छातीतील वेदना कायम आहेत. त्यांचे पती आमदार रवी राणा हेदेखील त्यांच्यासोबत आहेत. त्यांनाही कोरोना संक्रमण झाले असल्यामुळे लीलावतीत त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरु होते. मात्र, त्यांची तब्बेत आणखी बिघडल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ मुंबईला रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात नवनीत राणा उपचार घेत आहेत. सध्या त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असून त्यांच्या छातीत खूप दुखत असल्याची माहिती आहे. नवनीत राणा यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दरम्यान, नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या मुलांसाठी घरीच रहात होत्या. त्याच दरम्यान त्यांनाही ६ ऑगस्टला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. धक्कादायक म्हणजे नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांचा रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.