आरोग्यमहाराष्ट्र

आता कीटकांच्या पेशीपासून तयार होणार कोरोना लस!

रुग्ण जगभरात वाढतच आहेत. यावर लस कधी मिळणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अनेक देशातील शास्त्रज्ञांनी या व्हायरसवर प्रभावी लस शोधल्याचा दावा केला आहे. जगभरात कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर अनेक लसी या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत.

प्रभावी लस तयार करण्यासाठी भारत, ब्रिटन, अमेरिका, रशिया आणि चीन हे देश पुढे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये आता वेगळ्या प्रकारची लस तयार केली जात आहे. ही लस तयार करण्यासाठी आता कीटकांच्या पेशींचा वापर करण्यात आला आहे. तसेच या लसीच्या मानवी चाचणीलाही परवानगी देण्यात आली आहे.

चंगडू शहरातील स्थानिक प्रशासनाने या लसीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. कोरोनाच्या माहामारीबाबत चंगडू शहराच्या प्रशासनाने वी चॅटवर एक नवीन नोटीस दिली आहे. नोटीसनुसार लसीसाठी किटकांच्या पेशींमधील प्रोटीन्सचा वापर केला जात आहे. या लसीला चंगडू सिचुआन युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयात तयार करण्यात आले आहे. या लसीसाठी नॅशलन मेडिकल प्रोडक्ट्स एडमिनिस्ट्रेशनकडून वैद्यकीय परिक्षणासाठी मंजूरी मिळाली आहे.

संक्रमणाचा धोका ज्या व्यक्तींना सर्वात जास्त आहे अशा रुग्णांवर याचा वापर करता येणार आहे. मेडिकल कन्सेन्ट फॉर्म, साईड इफेक्ट्स मॉनिटर करण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय नियम पाळून ही लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर रुग्णांची निरीक्षणे नोंदवण्यात येणार असून, त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.