महाराष्ट्रशैक्षणिक

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण अशक्य

कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांसह शेतमजूर पालकांचे आर्थिक कंबरडे मोडले. शेतमालाला भाव नाही, सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात शासनाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. शहरी भागात सर्व सुविधा उपलब्ध असल्याने हा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी झाला. मात्र ग्रामीण भागात आजही नेटवर्क, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यांसह विविध समस्या आहेत. यामुळे ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण अशक्य झाल आहे.

दुसरीकडे पाल्यांसाठी मोबाईलचा भुर्दंड बसला. काही एकत्रित कुटुंबांत पाल्यांची संख्या अधिक असल्याने कोणा-कोणाला मोबाईल घ्यायचा असा प्रश्‍न पालकांना पडला. मोबाईल घेतला तर त्याच्या रिचार्जचा भुर्दंड बसत आहे. त्यात अनेक गावांत नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थी व पालक त्रस्त आहेत. ग्रामीण विद्यार्थी नेटवर्क मिळावे म्हणून गावाबाहेरील उंच टेकडी, उंच झाडावर किंवा ज्या ठिकाणी नेटवर्क मिळेल, अशा ठिकाणी जाऊन ऑनलाइन वर्गात सहभागी होत आहेत.

शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ऑनलाइन अभ्यासाचे वेळापत्रक, विषयानुरूप वर्गांचे वेगवेगळे ग्रुपही तयार करण्यात आले. शिक्षकांना विद्यार्थी ऑनलाइन दिसतो. मात्र, त्याच वेळी गावात विनाकारण फिरणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही चिंताजनक ठरत आहे. एकाच कुटुंबातील दोन किंवा तीन विद्यार्थी या प्रक्रियेत सहभागी असल्याने, एकाच वेळी पालकांना प्रत्येक पाल्यास स्मार्ट फोन देणे जिकिरीचे ठरत आहे. एकाच मोबाईलवर अभ्यास करावा, अशी पालकांची अपेक्षा असते. मात्र, ती फेल ठरत आहे.