महाराष्ट्रशैक्षणिक

विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा अशक्य, कुलगुरू समितीच्या बैठकीत निरीक्षण

राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये कशाप्रकारे परीक्षा घ्यायच्या, याविषयी अजूनही पेचप्रसंग कायम आहे. राज्यभरातील विद्यापीठांचा आणि त्यात आयोजित केला जाणाऱ्या परीक्षांचा कुलगुरु समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. कुलगुरुंनी दिलेला अहवाल उद्या सरकारकडे ठेवला जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेणे कठीणच असल्याची व्यथा यावेळी कुलगुरुंनी मांडली.

ऑफलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, त्यासाठी पुन्हा उद्या कुलगुरुंच्या समितीची बैठक आयोजित केली जाणार आहे. सरकारला अहवाल सादर केल्यानंतर त्यावर काय निर्णय घेतला जाईल हे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समितीची स्थापन केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुनच, या परीक्षा कशा घेता येतील, त्यावर विचार केला जाईल. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

राज्यातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती बघता सध्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर फिजिकली घेणं अवघड आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षा द्यायला लागू नये, असाच आमचा प्रयत्न आहे, असं उदय सामंत यांनी कालच स्पष्ट केलं होतं.