महाराष्ट्रराजकारण

‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे मुख्यमंत्रीच मंदिरात जाऊ देत नाहीत- मनसे

कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन आहे. राज्यातील मंदिरे यामुळे बंद आहेत. यावरून मनसेने उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. ‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्यावर लोकांना मंदिरात जाऊ देत नाहीत, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला. भाजप आणि वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिर प्रवेशासाठी आक्रमक झाले आहेत.

‘पहले मंदिर फिर सरकार, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत, याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामित्व सिद्ध करण्याची चढाओढ?’ असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर विचारला आहे.

सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नये, त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा’ अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल’ असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे. आता यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहावे लागणार आहे.