कोरोनाराजकारण

विरोधकांनी बिळात न बसता पीपीई कीट घालून करोना वॉर्डात जाऊन यावं – हसन मुश्रीफ

Newsliveमराठी – विरोधकांनी बिळात न बसता एखादे दिवस करोनाचे पीपीई किट घालून करोना वॉर्डात जाऊन यावे, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना लगावला आहे.करोना काळात आंदोलन करणाऱ्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे. ही वेळ आंदोलन करण्याची नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज आर्सेनिक एल्बम गोळ्या, जिल्हा परिषद सदस्यांना टॅब वाटप करण्यात आले. शासकीय विश्रामगृह येथे हा कार्यक्रम पार पडला.

त्यावेळी मुश्रीफ यांनी करोनाच्या काळातही राजकारण करणाऱ्या विरोधकांवर टीका केली. करोनाच्या काळात महाविकासआघाडीचे सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. तरी देखील विरोधक आंदोलनं करत आहेत. मात्र ही वेळ आंदोलनाची आणि टीका टिप्पणीची नसून सरकारला सहकार्य करण्याची आहे. करोनाची गंभीर परिस्थिती उद्भवली असताना आंदोलन करणाऱ्या विरोधकांना लाज वाटली पाहिजे. आंदोलनं करून बिळात लपून बसण्यापेक्षा एखादे वेळी करोना वॉर्डात पीपीई कीट घालून विरोधकांनी जाऊन यावं असा टोलाही त्यांनी लगावला आहे